बोलठाण जिल्हा परिषद शाळेत 302 विद्यार्थ्यांना फक्त तीन शिक्षक, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालक वर्गात नाराजी

नांदगाव प्रतिनिधी

मुक्ताराम बागुल

नांदगाव तालुक्यातील बोलठाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकूण 302 विद्यार्थी असून फक्त तीन शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आहेत. तर एक हेडमास्तर आहे असे एकूण चार शिक्षक आज रोजी या शाळेमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये पुरेशा शिक्षकाभावी शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून याबाबत शालेय व्यवस्थापन समितीतर्फे बोलठाण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याच्या घाट माथ्यावरील बोलठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकूण 302 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापूर्वी एकूण आठ शिक्षक होते त्यापैकी एक शिक्षक अगोदरच एक वर्षांपूर्वी मयत झाल्याने सदरचे पद रिक्त होते. या शिक्षकाऐवजी दुसरा शिक्षक एक वर्षापासून शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिला नाही. त्यातच पुन्हा 5 सप्टेंबर 2022 रोजी चार शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाल्याने अद्याप पर्यंत दुसरे चार शिक्षक बोलठाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपलब्ध झालेले नाहीत.. बोलठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही घाट माथ्यावरील मोठी शाळा असून या शाळेत विद्यार्थी संख्या देखील जास्त आहे. चाळीस विद्यार्थ्यांना एक शिक्षक याप्रमाणे नऊ शिक्षक आणि हे खेड मास्तर असे एकूण दहा शिक्षकांची आवश्यकता असताना आज रोजी फक्त तीन शिक्षक व एक हेडमास्तर या शाळेत कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. एकाच वेळी चार शिक्षक बदली झाल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून नवीन शिक्षक तात्काळ मिळावेत यासाठी बोलठाण जिल्हा परिषद शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती तर्फे शाळेचे मुख्याध्यापक यांना निवेदन देण्यात आले आहे. बोलठाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पहिलीपासून ते चौथीपर्यंत वर्ग आहेत ‌ प्रत्येक वर्गाच्या दोन तुकड्या होऊन आठ वर्ग होतात. सदर शाळेचा शैक्षणिक दर्जा ही उत्तम असल्याने पालक वर्ग आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी या प्राथमिक शाळेत आग्रही असतात. गेल्या एक महिन्यापासून शिक्षक बदली झाल्यापासून ते आज पर्यंत शिक्षक उपलब्ध न झाल्याने पालक वर्गात संताप व्यक्त होत आहे. तरी शासनाने तात्काळ शिक्षक देऊन विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी पालक करत आहेत. आधीच कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झालेले आहे. त्यातच आता कुठे शैक्षणिक घडी बसण्यास सुरुवात झाली. त्यात आंतरजिल्हा शिक्षक बदलीमुळे पुन्हा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी याकडे संबंधित विभागातील शिक्षणाधिकारी यांनी गांभीर्य आणि लक्ष देत तात्काळ शिक्षक द्यावेत व विद्यार्थ्याची होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी विनंती बोलठाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रितेश सुभाष नहार यांनी निवेदनाद्वारे विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *