कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथील एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. २१) दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर पोलिस ठाणे हद्दीत येणाऱ्या पोतरा येथील शेतकरी अशोकराव किशनराव मुलगीर (वय ६५) यांनी मंगळवारी स्वतःच्या पडीत शेतामध्ये टेंभुर्णीच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस जमादार मधुकर नागरे आणि गणपत काळे यांनी घटनास्थळी शेतात जाऊन पंचनामा केला. शेतकरी मुलगीर यांनी नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्या केली याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही; तसेच रात्री उशिरापर्यंत आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. शेतकरी अशोकराव मुलगीर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त होत असून, मुलगीर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.