बोरीच्या जैन वाचनालयाने उभारली पुस्तकांची गुढी
जिंतुर प्रतिनीथी माबुद खान
बोरी येथील कै.जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालयात आज गुढीपाडव्यानिमित्त पुस्तकांची गुढी उभारण्यात आली होती. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे बोरी परिसरात सर्वत्र कुतूहल व्यक्त होत आहे .सकाळी नऊ वाजता वाचनालयाचे ग्रंथपाल नेमीनाथ जैन यांनी ही पुस्तकांची गुढी उभारली. कथासंग्रह, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, पर्यावरण, कला, इतिहास,स्पर्धा परीक्षा व धार्मिक पुस्तके एकत्र करून त्या पुस्तकांची गुढी तयार करण्यात आली. या पुस्तकाच्या गुढीला फुलांचा हार, साखर हार व फुलांनी सजविण्यात आले होते. आंब्याच्या पानाचे तोरण यावेळी लावण्यात आले. एक प्रकारची आगळीवेगळी गुढी या निमित्ताने उभारण्यात आली होती . गुढी उभारल्यानंतर वाचनालयाच्या अध्यक्ष सौ.मीना नेमिनाथ जैन, कार्यकारिणी सदस्या सौ. कांता बालाप्रसाद सोमानी, सौ. सुनीता सूर्यप्रकाश सोनी, सौ. दैवशाला दीपकराव राजूरकर, सौ. प्रतिभा पवनकुमार ओझा ,सौ. भारती राजेशकुमार ओझा यांनी गुढी जवळ दीप प्रज्वलन केले व गुडी समोर असलेल्या सरस्वतीच्या प्रतिमेची विधिवत पूजा केली. त्यानंतर सरस्वतीची आरती करण्यात आली. *”चौकट”**शासनाने आमच्या समस्या सोडवल्या तरच आमच्या संसाराची गुढी उभी राहिल**सन 2012 पासून ग्रंथालयीन कर्मचा-यांच्या विविध समस्या शासनाने न सोडविल्या मुळे ग्रंथालयात काम करून अल्पशा पगारात संसाराचा गाडा हाकणे हे फार जिकरीचे झाले आहे. ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या या ग्रंथालयांच्या समस्या शासनाने सोडवल्या तरच आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या संसाराच्या गुढ्या उभ्या राहतील, याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. शासन ग्रंथालयांच्या समस्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. अत्यंत अल्पशा मानधनात ग्रंथालयात काम करणे जिकरीचे झाले आहे. एखाद्या मजूरा पेक्षाही कमी वेतनात ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे .तीस- चाळीस वर्ष या ग्रंथालयात काम केल्यामुळे अन्य कामे ही आम्हाला आता करता येत नाहीत. त्यामुळे शासनाने ग्रंथालयांचे अनुदान वाढवणे, ग्रंथालयाचा दर्जा बदल करणे ही काळाची गरज बनली आहे. पुरोगामी राज्य अशी ओळख असलेल्या या महाराष्ट्रात ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना पोटभर अन्न मिळत नाही ,ही शोकांतिका आहे. नुकताच राज्याच्या आघाडी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात वेळोवेळी मंत्र्यांनी व अधिकार्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे काहीतरी हाती लागेल अशी अपेक्षा होती. मात्र, या अर्थसंकल्पात ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना ठेंगाच दाखविण्यात आला आहे.