औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी येथील 25 वर्षीय युवकाचा खुन
औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी येथील एका तरुणाचा डिग्रस कऱ्हाळे शिवारामध्ये शेतात दगड डोक्यात घालून तसेच काठीने मारहाण करून खून झाल्याची घटना रविवारी (ता. 23) सकाळी दहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी येथील सचिन धवसे (25) हा तरुण शनिवारी रात्रीपासून बेपत्ता होता. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो सापडला नाही.दरम्यान रविवारी सकाळी सावळी बहिणा ते डिग्रस कऱ्हाळे शिवारामधील एका शेतात तरुणाचा मृतदेह आढळून आला. सावळी येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता सदरील मृतदेह हा सावळी बहिणा येथील ग्रामपंचायत ऑपरेटर सचिन याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गावकऱ्यांनी या घटनेची माहिती तातडीने औंढा नागनाथ पोलिस ठाण्याला दिली. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली औंढानागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक वाघमारे, जमादार चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.सदरील खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले. श्वान पथकाने घटनास्थळापासून अर्धा किलो मीटर अंतरापर्यंत माग काढला.सदरील घटनेची पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता मृत सचिन यांच्या डोक्यात दगड घालून तसेच काठीने मारहाण करून खून झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला तातडीने ताब्यात घेतले तर अन्य दोघे जण फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. या खुनाचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.