हिंगोलीः जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने दिवसाढवळ्या लूटीच्या घटना वाढल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील चोंडीआंबा येथे दुपारी चोंडीआंबा येथे असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेवर चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून बँक लुटण्याचा प्रयत्न केला आहे. हा सर्व चित्तथरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आज चोरट्यांनी बँकेमध्ये प्रवेश करून बँक लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. अयशस्वी झालेल्या चोरट्यांनी रागाच्या भरात बँकेच्या दिशेने गोळीबार सुद्धा केला आहे. बँकेमध्ये रोकड नसल्यामुळे हा त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसून एक गोळी बँकेच्या काचावर लागली आहे. चोरट्यांनी एकूण तीन गोळ्या बँकेच्या दिशेने झाडल्याची सुद्धा प्राथमिक माहिती आहे.