औरंगाबाद जिल्हा : काळाचा आघात किती वेदनादायी असतो, याचा थरार गुरुवारी पहाटे घडलेल्या भीषण अपघातातून पुढे आला.वऱ्हाडाला घेऊन निघालेल्या पिकअप वाहनाचा सिल्लोड-कन्नड मार्गावरील मोढा फाट्यावर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकून झालेल्या भीषण अपघातात मंगरूळ येथील एकाच कुटुंबातील सहा जणांचा अंत झाला तर तब्बल १४ जण गंभीर जखमी झाले. या अपघातातील मृतदेह उत्तरीय तपासणी केल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यावर गुरूवारी दुपारी मंगरूळमध्ये सहाजणांची अंत्ययात्रा एकाच वेळी निघाली. यावेळी नातेवाईकांनी फोडलेला टाहो, हुंदके अन् हाहाकाराने सर्वत्र शाेककळा पसरली होती. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या अपघातात मंगरूळ येथील खेळवणे कुटुंबातील चार महिलांचा अंत झाल्याने त्या घरात आता चूल पेटविण्यासाठी महिलाच उरली नाही. तर सख्ख्या भावांचाही अंत झाला आहे. चारही कुटुंबातील मुलांवर अनाथ होण्याची वेळ आली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी रुग्णालयात जाऊन जखमींना व मृतांना मदत करत कुटुंबांचे सांत्वन केले.