कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येडोबा येथे आज सायंकाळच्या सुमारास अचानक जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकांच्या केबिनला आग ल

कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येडोबा येथे आज सायंकाळच्या सुमारास अचानक जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकांच्या केबिनला आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग एवढी भीषण होती की यातील शाळेतील शैक्षणिक साहित्य जळून खाक झाले आहे. सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.आग लागल्याची बातमी गावात पसरताच गावातील नागरिकांनी आज विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. वाकोडी गावामध्ये पाचवी ते दहावी पर्यंतचे वर्ग आहेत. सुदैवाने मात्र यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.सध्यातरी या प्रकरणी कुठल्या गुन्ह्याची नोंद झाली नसून गावकरी व अग्निशमन दलाच्या मदतीने वेळीच आग नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. शाळेच्या बाजूलाच काही अंतरावर गाव आहे. आग वेळीच नियंत्रणात आली नसती तर इतरही ठिकाणी आगीचा धोका निर्माण झाला असता, असा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. धगधगत्या आगीचे लोट मात्र एक किलोमीटर अंतरावरून दिसत होते. आगीच्या कचाट्यात मात्र काही क्षणात साहित्याची राखरांगोळी झाली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.