सेनगाव (हिंगोली) तहसीलवर धडकला शेतकऱ्यांचा प्रचंड जन आक्रोश मोर्चा…रविकांत तुपकरांनी थेट दवाखान्यातून भ्रमणध्वनी द्वारे शेतकऱ्यांना केले संबोधित..!
हिगोंली जिल्हा प्रतिनिधी शेख खाजा
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तहसील कार्यालयावर आज ता.०९ सप्टेंबर २०२३ रोजी शेतकऱ्यांच्या प्रचंड आक्रोश मोर्चा धडकला. या मोर्चाला ॲड. शर्वरी सावजी- तुपकर यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना संबोधित केले. या मोर्चाचे नेतृत्व शेतकरी नेते रविकांतभाऊ तुपकर करणार होते पण प्रकृतीच्या कारणाने मुंबई येथील हॉस्पिटल मधे ॲडमिट असल्याने त्यांनी थेट दवाखान्यातून भ्रमणध्वनी द्वारे शेतकऱ्यांना संबोधित केले. तर या मोर्चाचे नेतृत्व ॲड. शर्वरी सावजी- तुपकर, गजानन कावरखे, नामदेव पतंगे, माधव गाडे व डॉ.ज्ञानेश्वर टाले यांनी केले. या मोर्चाला हजारो शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.तातडीने राज्यात दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, पीकविम्याची अग्रीम रक्कम तात्काळ मिळावी, वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, यासह अन्य मागण्यांसाठी आज हा प्रचंड आक्रोश मोर्चा निघाला, शेतकऱ्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत उठणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, शेतकऱ्यांनी प्रचंड जोशात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला, अखेर प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सदर मोर्चाची सांगता करण्यात आली. शेतकऱ्यांबद्दलची आस्था रविकांतभाऊंना काही स्वस्थ बसू देत नाही. डॉक्टरांनी बोलण्यास मनाई केलेली असतांनाही शेतकरी व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव हॉस्पिटलमधून त्यांनी भ्रमणध्वनी द्वारे या मोर्चाला संबोधित केले. हे पाहून शेतकऱ्यांचे अक्षरशः डोळे पाणावले. तर रविकांतभाऊंच्या प्रत्येक वाक्यावर शेतकऱ्यांनी प्रचंड टाळ्यांचा गडगडाट केला . लवकरच बरे होवून राज्यभर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तरुणांची मोठी फौज उभी करत राज्यभर आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी रविकांतभाऊ तुपकरांनी दिला.