ग्राम विद्युत व्यवस्थापकांची उर्जा मंत्रालयाच्या प्रधान सचिवांशी सकारात्मक चर्चा
ग्राम विद्युत व्यवस्थापकांची उर्जा मंत्रालयाच्या प्रधान सचिवांशी सकारात्मक चर्चामहाराष्ट्र सरकारच्या ग्राम विकास मंत्रालय आणि उर्जा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम विद्युत व्यवस्थापक या जागेसंदर्भात तत्कालीन उर्जा मंत्री मा.ना.चंद्रशेखरजी बावनकुळे, यांच्या मार्गदर्शनात आक्टोंबर २०१६ मध्ये शासण निर्णय काढण्यात आला आणि त्यानुसारच ग्राम पंचायत व विद्युत कंपनीकडून ह्या जागा भरण्यात आल्या होत्या. पण त्यावेळी कागदपत्रे छाननी पर्यंत हा विषय गेला आणि माशी कुठे शिंकली माहीत नाही पण तो प्रश्न आजपर्यंत तसाच अडगळीत पडला. या प्रश्नाची उकल करण्यासाठी महाराष्ट्र ग्राम विद्युत व्यवस्थापक संघटना स्थापन करुन मागील वर्षांपासून वारंवार आणि ठिकठिकाणी निवेदने देऊन प्रयत्न केले गेले. त्याच अनुषंगाने आज संघटना मंत्रालयाच्या उर्जा विभागात चर्चा करण्यासाठीच संघटनेचे पदाधिकारी आले होते. यावेळी उर्जा मंत्री तथा उपमुख्यमंत्री मा.ना.श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मंत्रालयातील प्रधान सचिव श्रीमती आभा शुक्ला यांच्याशी सविस्तर चर्चा करुन अडगळीत पडलेला प्रश्न त्यांना समजावून सांगीतला. आणि संबंधित प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेला यश आले. हा प्रश्न आत्मियतेने आणि सहिस्नुतेने सोडवण्याचा व मार्गी लावण्यासाठी त्यांनी संघटनेला विश्वास दिला. यावेळी त्यांनी चर्चेसाठी आपल्या महत्वाच्या वेळातला बराच वेळ दिला. यानंतरच्या कार्यवाहीसाठी प्रत्येक ग्राम विद्युत व्यवस्थापकांनी आपली कागदपत्रे संघटनेकडे जमा करून संघटनेच्या पुढील कामकाजाला हातभार लावावा असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष श्री रविकुमार साखरे साहेब यांनी केले आहे. या चर्चेसाठी संघटनेचे अध्यक्ष रविकुमार साखरे, उपाध्यक्ष बि.आर.कांबळे, राज्य संघटक राजकुमार पांचाळ, कोषाध्यक्ष जानकीराम वाघमारे, हिंगोली जिल्हाध्यक्ष संदीप कांबळे,बुलढाणा जिल्हाध्यक्ष दत्ता महाले, उपाध्यक्ष अमोल उमाले, संभाजी नगर जिल्हाध्यक्ष राहुल शेजुळ, उपाध्यक्ष धनजी येवले इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. समाधानकारक चर्चेबध्दल संपूर्ण महाराष्ट्रातून संघटनेतर्फे श्रीमती आभा शुक्ला यांचे आभार मानले जात आहेत.