पाचोरा येथे पत्रकारावर गुंडाकरवी हल्ला करणाऱ्या आमदार किशोर पाटील यांच्याविरुद्ध कारवाई करा जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाची मागणी
बदनापुर हाफीज हारून पठाण (प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर गुंडाकरवी भ्याड हल्ला केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार किशोर पाटील यांच्याविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करून, त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने आज तातडीने निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांची घेऊन, त्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पाचोरा येथील एका घटनेसंदर्भात संदीप महाजन यांनी बातमी दिली होती. त्याचा राग धरून पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना चार दिवसांपुर्वी फोन करून अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली होती. ही क्लीप व्हायरल झाल्यावर आमदारांनी साळसुदपणे शिविगाळीचे समर्थन देखील केले होते. या घटनेची संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटली होती. मात्र तेव्हा संदीप महाजन यांनी समन्वयाची, सामंजस्याची भूमिका घेतली. तरीही आमदारांची खुमखुमी थांबत नव्हती. दरम्यान, गुरुवारी संदीप महाजन रेल्वे आंदोलनाची बातमी कव्हर करून घरी परतत असताना चार पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. नगर पालिकेसमोर ज्या चौकात हल्ला झाला तो चौक महाजन यांच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांच्या नावानं ओळखला जातो. येथेच त्यांना लाथाबुक्कयांनी बेदम मारहाण केली आहे. महाजन त्यात गंभीर जखमी झाले आहेत. संदीप महाजन यांनी पोलिसात तक्रार दिली असून आ. किशोर पाटलांनीच आपल्यावर गुंडाकरवी हल्ला केल्याची तक्रार केली आहे.सत्य बातमी देणाऱ्या पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या घटना महाराष्ट्रात सातत्यानं घडत आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींना काम करणे अशक्य झाले असून राज्यात माध्यम स्वातंत्र्यच धोक्यात आले आहे. पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पाचोर्याचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि राज्यपालांनी त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष फकीरा देशमुख, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानदेव पायगव्हाणे, कार्याध्यक्ष किशोर आगळे, जिल्हा सरचिटणीस नारायण माने, उपाध्यक्ष अभयकुमार यादव, कोषाध्यक्ष धनसिंह सूर्यवंशी, चिटणीस शेख मुसा, जिल्हा कार्यकारणी सदस्य गणेश औटी, धनंजय देशमुख, संतोष सारडा, मोहन मुळे, अशोक शहा, राजकुमार भारूका, सर्जेराव गिऱ्हे, रवींद्र मुंडे, विजय कमळे पाटील, विलास गायकवाड, कृष्णा पठाडे, विजय साळी, सीताराम तुपे, प्रभूदास भालेराव, अजय गाढे, संजय आहेर, आमेर शेख, गंगाराम आढाव, शेख इब्राहिम, गौरव साळी, लेविदास निर्मल, जीवन दहातोंडे आदीसह अनेक पत्रकार उपस्थित होते.