गोरेगांव-कनेरगांव नाका रस्त्यावरील सवना परीसरात दुचाकीचा भीषण अपघात,दोघे ठार,एक गंभीर
हिंगोली जिल्हा प्रतिनिधी शेख खाजा
गोरेगाव ते सवना मार्गावरील वळण रस्त्यावर दुचाकी अपघातामध्ये दोन जण ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना आज ( दि. १५) पहाटे घडली. विशाल भारत नायक (रा.सवना) व सुनील लक्ष्मण चौधरी (रा. बोरी, ता. जिंतूर) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. सुनील चौधरी हा मुंबई येथे महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिंतूर तालुक्यातील बोरी येथील सुनील चौधरी हे त्यांचे मित्र संदीप बालाजी शिंदे यांच्यासोबत शनिवारी सेनगाव तालुक्यातील सवना येथे नातेवाईकांकडे आले होते. सुनील, संदीप व त्यांच्या मामाचा मुलगा विशाल हे दुचाकीवरुन सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील यात्रेला गेले. यात्रेत फिरून पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ते परत सवनाला येत होते. गोरेगाव ते सवना मार्गावर असलेल्या वळण रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. सुनील चौधरी व विशाल नायक यांचा मृत्यू झाला. तर संदीप शिंदे गंभीर जखमी झाले.