हिंगोलीत जलेश्वर तलाव परिसरात अतिक्रमण हटाव मोहिम, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पोलिसांच्या ताब्यात
हिंगोली शहरातील जलेश्वर तलावाच्या परिसरात असेलेली अतिक्रमणे हटविण्यास आज (दि.16) सुरुवात झाली. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून अतिक्रमण काढण्यास विरोध करणारे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विनायक भिसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तीन जेसीबी मशीन व दहा ट्रॅक्टरच्या मदतीने अतिक्रमण काढून साहित्य जप्त केले जात होते. तर काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली होती. दरम्यान अतिक्रमण काढण्यास शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख विनायक भिसे यांनी तीव्र विरोध दर्शवला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी अतिक्रमणधारक, पोलिस कर्मचारी, पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादलाही तोंड फुटले होते. काही ठिकाणी महिलांनीही अतिक्रमण काढण्यास विरोध केला. मात्र महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांची समजूत काढली.परिसरात अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाल्यानंतर वीज कंपनीनेही अतिक्रमधारकांच्या निवासास्थानांचा वीज पुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हिंगोली शहरात सर्वच ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आहेत.